बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील पिंडीवर बर्फ साठल्याचा व्हिडीओ सामाज माध्यमांत व्हायरल झाला. त्याची सत्यता तपासण्यासाठी देवस्थान ट्रस्टने सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. मात्र, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर शहराच्या मध्यवस्तीत असून मंदिर गर्भगृहात खिडक्या नाहीत. दरवाजे बंद केल्यावर अधिक गरम होते. येथे पुरोहित थंडीतही घामाघूम होतात. सध्या गर्दीचे वातावरण असताना बर्फ आला कुठून, यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेला मंदिराच्या विश्वस्तांनीही दुजोरा दिला नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिरात फक्त पिंडीमध्ये असलेल्या खड्ड्याच्या मापाचा बर्फ अचानक कोणास दिसला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंदिरात चित्रीकरणास बंदी असताना त्याचे चित्रीकरण करत प्रसारित कशासाठी करण्यात आले. कॅमेरे लावलेले असताना पिंडीवर अचानक ठराविक मापाचा बर्फ आढळणे हा कल्पनेबाहेरचा विषय आहे. त्र्यंबकेश्वरचे भाविक व पुरोहितही या गोष्टी मानत नाहीत. यापूर्वी कधीही बर्फ साचलेला नाही. भाविकांच्या श्रद्धेस ठेच देऊ पाहणारे हा उद्योग का करताहेत, अशाही शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नये :
पिंडीवर बर्फ जमा होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण आहे. गाभाऱ्यातील तापमान आणि बाहेरच्या तापमानात १२ ते १३ अंशांची तफावत असते. गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने बर्फाचे लहान थर जमा होतात. हा चमत्कार किंवा दैवी संकेत नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन अंनिसने केले आहे.
..तर २१ लाखांचे बक्षीस देऊ
मंदिरात बर्फ साचल्याचा व्हिडिओ प्रसारित होत असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आम्हाला तातडीने द्यावेत. याबाबत तथाकथित चमत्काराचा भंडाफोड आम्ही जरूर करू. जर कोणी हा चमत्कार आहे, असे म्हणत असेल तर २१ लाखांचे बक्षीस देऊ, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सांगण्यात आले.