मुंबई : दरवर्षी पाऊस जास्त झाल्याने मुंबईची लाईफनाईन पाण्याखाली जाते. यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यंदा मात्र रेल्वेने (Railway) मान्सूनपूर्व (Pre Monsoon) तयारीसाठी कंबर कसली आहे. यामुळे यंदा रेल्वे रुळ पाण्याखाली जाणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील रूळ पाण्याखाली जातात. मात्र, यंदाच्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने विविध कामांना महिनाभर आधीच सुरुवात केली आहे. ही कामे मे महिन्यातच पूर्ण झाली असून यंदा रूळ पाण्याखाली जाणार नाहीत, असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.
नाले, गटारांची सफाई करतानाच पाणी उपसा करण्यासाठी पंपही बसवण्यात आले आहेत. पावसाळ्यास तोंड देण्यासाठी रेल्वे सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेवर अद्यापही काही कामे सुरू असून त्यांना गती दिली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.