अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या झळा (Heat Wave) जाणावत आहे. यामुळे पेरणी करावी की नाही याबाबत शेतकरी साशंक आहे. यासाठी सर्वच जण हवामान खात्यातील (Weather Department) अंदाजाकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु, यंदा मान्सूनच्या (Monsoon) वाटचालीबाबत हवामान खातेच संभ्रमात असल्याचे समजत आहे.
मान्सून यंदा महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु, जूनचा एक आठवडा उलटूनही पावसाच्या सरी न बरसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकही चिंतातूर झाले आहेत. अशातच राज्यात अनेक शहर व जिल्ह्यांमध्ये पाणीसंकट उभे राहीले आहे. अशातच मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. परंतु, स्कायमेटने केरळमधील पाऊस मान्सून नसल्याचा दावा केला होता. यामुळे मान्सूनबाबत हवामान खातेच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पुणे वेधशाळा प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांना विचारले असता ते म्हणाले, अरबी समुद्रात प्रतिचक्रिय वारे वाहू लागल्याने मान्सूनचं आगमन लांबले असून केरळमध्येच मान्सून रेंगाळला आहे. गोवा, कोकणात 9 ते 12 तारखेदरम्यान पूर्व मान्सून सरी कोसळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी येणार? यावर बोलण्यास हवामान खात्याने स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्रातील मान्सूनबाबत हवामान खात्यानेच पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी आता कोणाकडे पाहायचे असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.