गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पडलेला गारवा आता परतीच्या वाटेवर आहे. शक्यतो १३ फेब्रुवारीपासून थंडी कमी होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. हवामानात सतत बदल होत असल्याने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वातावरणात सध्या बदल पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात व मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यात रविवारी ढगाळ वातावरणाची व अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, मात्र मुंबईसह कोकणात वातावरण स्वच्छ असेल.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता.दरवर्षी फेब्रुवारीत पहाटेचा जो गारवा जाणवतो त्याऐवजी अधिक उबदारपणा जाणवेल. १३ फेब्रुवारीपासून राज्यातील हिवाळी हंगामाची सांगता होईल, थंडी लवकर गेल्यामुळे शेतपिकांवर परिणाम जाणवेल. हुरड्यावर आलेली धान्यपिके अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ