मुंबई : भाजप खासदार रवी राणा आणि नवनीत राणा (Ravi Rana And Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी न्यायालयाने राणा दाम्पत्याला बांधकाम कायदेशीर करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली आहे. यावर बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करू, अशी हमी राणा दाम्पत्याने कोर्टाला दिली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे. त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी बीएमसीकडे (BMC) आल्या होत्या. त्यानंतर राणा दाम्पत्याला 7 दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला राणा दाम्पत्यांनी उत्तरे दिली होती. परंतु, ती उत्तरे पालिकेने अमान्य करत इशारा दिला होता. बीएमसीविरोधात राणा दाम्पत्य दिवाणी न्यायालयात पोहोचले होते.
दिवाणी न्यायालयाने राणा दाम्पत्याचा अर्ज स्वीकारला असून त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. नवनीत आणि रवी राणा यांची बेकायदा बांधकामे महिनाभरात नियमित झाली तर ठीक, अन्यथा बीएमसी कोणतीही कारवाई करण्यास मोकळी आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर राणा दाम्पत्याने न्यायालयाला त्यांच्या फ्लॅटचे बेकायदा बांधकाम नियमित करून घेणार असल्याचे सांगितले.
बीएमसीच्या नोटीसमध्ये राणा दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये किमान 10 बेकायदा बांधकामे आढळून आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आता जर राणा दाम्पत्याने ते बांधकाम वेळेत नियमित केले नाही तर त्यांच्या फ्लॅटवर कारवाई होऊ शकते.