रिध्देश हातीम | मुंबई : पर्निया पॉप अप स्टुडिओमध्ये सहा लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी शिताफीने पाच तासांच्या आत चोराला अटक केली. उदित रामसिंग पाल (वय 20) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
पर्निया पॉप अप स्टुडिओमध्ये सहा लाखांची रक्कम चोरी झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावरुन दुकानात हाऊस किपींगचे काम करणाऱ्या एका संशयित इसामास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. चोरी करण्याच्या उद्देशाने लपून राहून दुकान बंद झाल्यानंतर कॅश ड्रॉवरमधील रोख रक्कम 6 लाख 56 हजार 208 रुपये चोरी करून निघून गेल्याची कबुली आरोपीने दिली आहे. तसेच, दुसर्या दिवशी कामावर सुद्धा परत आला होता.
ही कामगिरी सांताक्रूझ पोलीस गुन्हे तपास पथक धनंजय आव्हाड, रामचंद्र मेस्त्री, नेताजी कांबळे, नागेश शिरसाठ, राहुल परब, भटू महाजन यांनी बजावली. आरोपीला अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेली 100 टक्के मालमत्ता हस्तगत केली असून मालकास परत करण्यात आली आहे.