आदेश वाकळे | संगमनेर : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारातील ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याच वेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्दही पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला.
वकील आशिष प्रभाकर पोलादकर (वय ३४, रा.सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (वय ३७, रा. , ता.कन्नड), वकील अनंत रामराव मगर (वय ३६, रा.हिंगोली) येथील युवक हे संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच भंडारदरा असल्याने तो पाहण्यासाठी पर्यटनासाठी ते तिघे निघाले होते. मात्र, त्यांचा रस्ता चुकल्याने ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशि फाट्याच्या पुढे गेले.
रस्ता चुकला लक्षात येताच रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने निघाले. यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज आला नाही. व त्यांची क्रेटा कार थेट जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. त्याच वेळी बोलेरो गाडीतून एक प्रवासी लघु शंकेसाठी थांबला, परंतु, नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला. दरम्यान, ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.