निसार शेख। रत्नागिरी: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाजी मारली असून ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्यातील एकूण 24 ग्रामपंचायतींवर ठाकरे गट शिवसेनेने आघाडी घेतली असून शिंदे गटाला मात्र जिल्ह्यात फक्त 7 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे.
दापोली विधानसभा मतदार संघात मात्र शिंदे गटाने बाजी मारली असून विद्यमान आमदार योगेश कदम यांनी 10 पैकी 8 ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा फडकवून पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदार संघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. खेड तालुक्यातील अस्तान गावातील निवडणूक निकालावर एका उमेदवाराने आक्षेप घेत फेरमतदानाची मागणी केली आहे.
तर गुहागर विधानसभा मतदार संघात आमदार भास्कर जाधव यांनी देखील आपले वर्चस्व कायम ठेवत गुहागर तालुक्यातील 5 पैकी 2 ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा झेंडा फडकवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 51 पैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 36 ग्रामपंचयतींसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 24, शिंदे गट शिवसेना 7, भाजपा 1, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 0 तर इतर 17 असा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यात खेड तालुक्यातील अस्तान गावात एकाच ठिकाणी निकालावर आक्षेप घेत फेर मतदानाची मागणी करण्यात आली आहे.