अमोल धर्माधिकारी | 2018 ला झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेच्या गैरव्यवहार मध्ये दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त असलेले तुकाराम सुपे यांच्याकडून आत्तापर्यंत तीन कोटींची रक्कम आणि सोने असा मुद्देमाल जप्त केल्यानंतर याच प्रकरणात 2018 सालचा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार याच्याकडे तब्बल एक कोटींच सोन-चांदी जप्त करण्यात आले आहे. पुणे सायबर पोलिसांना मोठं घबाड सापडलंय.
बंगळूर येथून काही दिवसापूर्वी अश्विनकुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि शनिवारी त्याच्या बंगळूर येथील घराची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांना सोने आणि चांदीचे विविध दागिने आणि वस्तू सापडल्या आहेत. ज्याची रक्कम जवळपास एक कोटींहून अधिक आहे. यामध्ये दीड किलो सोने तर तब्बल 27 किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे.त्यामुळे या कारवाई दरम्यान पोलीसही थक्क झालेत.
2018 ला शिक्षण पात्रता परीक्षा झाली होती.त्या निकालात फेरफार करण्यात आले होते.त्यावेळी जीए कंपनीचा संचालक अश्विनकुमार होता आणि यावेळी त्यानी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे आणि तुकाराम सुपे यांच्याशी संगनमत करून जवळपास 500हून अधिक परीक्षार्थीकडून प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपये घेतल्याचं पोलीस तपासात सुरु आहे.टीईटी प्रकरणात आत्तापर्यंत आठ ते नऊ जणांना अटक करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त राहिलेले आणि सध्या निलंबित असलेले तुकाराम सुपे यांच्याकडून मात्र दिवसेंदिवस लाखोंच्या रक्कमा हस्तगत केल्या जात आहेत.