मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागला असून एका दिवसात तापमानात दोन अंशानी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रझ केंद्रात 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाली असून मुंबई आणि परिसरात दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
वातावरणातील दाहकता वाढल्याने डोक्यावर टोपी किंवा रूमाल घेऊन मुंबईकर बाहेर पडताना दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील कमाल तापमान साधारण 31 ते 33 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मात्र, त्याच वेळी पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली लागली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कुलाबा केंद्रात कमाल तापमानात 1.2 अंश सेल्सिअसने, तर सांताक्रूझ केंद्रात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस तापमानात वाढ होईल, असा अंदाज आहे. राज्यात उकाडा, ऊन आणि पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.