पुणे : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मास्क वापरणे बंधनकारक नाही पण काळजीसाठी मास्क वापरू शकता. जनतेने घाबरु नये कारण JN 1 सौम्य आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तानाजी सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि हसन मुश्रीफ आमच्या मध्ये काल एक बैठक झाली. या बैठकीत आरोग्य यंत्रणा आणि इतर आरोग्य सामग्री या संदर्भात आढावा घेण्यात यावा. अधिवेशनात नवीन व्हेरियंटची माहिती मिळाली होती. 15 डिसेंबर रोजी आरोग्य खात्याला या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मॉक ड्रील घेण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क आणि तयार आहे. बेड, ऑक्सीजन बेड आणि डॉक्टर यासह मनुष्यबळ देखील तयार आहे. टेस्टिंग किट राज्यात पुरेसे उपलब्ध आहेत. राज्यात पुरेसा ऑक्सिजन देखील पुरेसा उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील आज सगळ्या ठिकाणचा आढावा घेण्यात आला. राज्यातील सीएसडीएचओने दररोज एक तास आढावा घेणार आहेत. जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका. नाताळ, नवीन वर्ष आणि सुट्ट्यांचा कालखंड सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क वापरा. मास्क वापरणे बंधनकारक नाही पण काळजीसाठी मास्क वापरू शकता. जनतेने घाबरु नये कारण JN 1 सौम्य आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. राज्यात पुन्हा टास्क फोर्स तयार केला जाणार आहे. राज्यात सध्या JN 1 चा फक्त एक रुग्ण असल्याचे तानाजी सावंतांनी सांगितले.