गोपाल व्यास | वाशिम : पोलीस कर्मचारी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. कर्तव्यासाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी प्रेमळही होतो, इतरांचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी तो नेहमीच मेहनत घेत असतो, याचाच परिचय येतो वाशिम जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बोडखे यांच्याकडे पाहून.
पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बोडखे हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील कृष्णा गावाचे आहेत. ते 2008 साली ते पोलीस दलात भरती झाले. ग्रामीण भागातील हजारो मुलं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न घेऊन तयारी करत असतात. मात्र, तयारी करतांना नेमकं मार्गदर्शन त्यांना मिळतं नाही. स्वतःच्या क्षमता कशा वाढवायचा त्यासाठी कोणता व्यायाम करायचा याची शास्त्रीय माहिती त्यांना नसते. प्रशिक्षक लावायचा म्हटलं तर खूप खर्च येतो, हीच अडचण लक्षात घेऊन प्रदीप यांनी मुलांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यासाठी कोणतीही फिस घ्यायची नाही हे ठरवलं. आपलं कर्तव्य सांभाळून क्रीडा संकुलावर प्रशिक्षण देण्याचं काम गेले बारा वर्षांपासून ते करत आहेत.आजवर शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवून त्यांना पोलीस कर्मचारी अधिकारी बनवण्याचे काम बोडखे यांनी केले आहे.
पोलीस भरतीचे प्रशिक्षन काही विद्यार्थी जवळपास दोन वर्षांपासून प्रदीप बोडखे पोलीस कर्मचारी यांच्याकडून घेत आहेत आणि प्रदीप सुद्धा रोज टाईम काढून विद्यार्थ्यांना आपलेसे समजून शिकवण देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले की बोडखे सर हे आमच्यासोबत भावासारखे राहतात. त्यांनी आम्हाला आपलंसं समजलं ते आम्हाला एका गुरुस्वरूपात मिळाले आम्ही त्याच मनापासून धन्यवाद करतो, असेही बोलतांना विद्यार्थ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील मुलांचे प्रशिक्षण थांबू नये यासाठी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आजही खाकीतील प्रदीपकडून हाक दिली जाते. त्याला प्रतिसाद देत कर्तृत्वाचा डोंगर उभा राहिला असून मार्गदर्शनाच्या निमित्ताने प्रदीपचे हात प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पाठीवरून फिरले.