महाराष्ट्र

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचं लोकशाहीला पत्र; म्हणाल्या...

सुषमा अंधारे यांनी प्रिय लोकशाही असे म्हणत पत्र लिहिले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुषमा अंधारे यांनी प्रिय लोकशाही असे म्हणत पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्राबाबत आता चर्चा रंगल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी पत्र लिहित म्हटले आहे की, प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.

पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील 'व्यक्तीने' माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले. किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला.

अगदी तितक्याच अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे. सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे

त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही. किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही.

सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? किंवा महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असे दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगाट करणारा प्रत्येक सदस्य त्यांनी ही भूमिका का घेतली नाही? की मग सभापती पदावरील व्यक्ती श्रीमती गोरे या छ. शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का ? की जेणेकरून त्यांच्या संबंधाने नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो मात्र राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात.

प्रिय लोकशाही , माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही. भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news