सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.
यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.