केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह यांनी म्हटले की, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख आहेत. देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धवजी आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांना एवढा तर अधिकार आहे ना टीका करायचा. विरोधक पण दिलदार असला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे. आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत, आम्ही दडपशाहीवाले नाही. त्याच्यामुळे तो अधिकार अमित शाहांना आहे. ते आमचे काय गुणगान गाणार नाहीत, ते आमच्यावर टीकाच करणार आहेत. पण टीका करताना एक अतिशय विनम्रपणे अमित शाहजी जे काल बोलले, ते मला थोडं आश्चर्यपण आणि हास्यास्पद पण वाटलं. याचे कारण असं की, आधी ते मोदी सरकार होतं, आता ते एनडीए सरकार आहे. पण जेव्हा मोदी सरकार होते, त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण गेले 6 दशकं 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे. पण कदाचित अमित शाहजींना त्याचा विसर पडला असेल. काल ते ज्या वास्तुमध्ये बोलत होते ती ही वास्तू आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच बालेवाडी झालेली आहे कदाचित ते ही त्यांना कुणी सांगितले नसेल.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट डेटा. मी डेटानुसार बोलते, जेव्हा अमित शाहजी यांची महाराष्ट्रातील लीडरशीप जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करते. तेव्हा 90 टक्के लोक ज्यांच्यावर ते आरोप करतात ते भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष, मंत्री, मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात. काल अमित शाहजी जेव्हा भाषण करत होते, त्याच्या मागेच अशोक चव्हाणजी बसले होते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.