संगमनेर : कीर्तनकार इंदुरीकर आपल्या कीर्तनाने नेहमीच चर्चेत असतात. अशाच एका वक्तव्यामुळे इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लिंगभेदावरून केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. इंदुरीकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पुढील सुनावणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.
इंदुरीकर यांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केले होते. त्या विधानावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद न्यायालयाने दिले होते. याविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, ही याचिका फेटाळण्यात आली. यानंतर इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयातही इंदुरीकरांना दिलासा मिळाला नसून याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे आता इंदोरीकरांवर संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केस चालणार आहे.
काय होते इंदुरीकरांचे विधान?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यकक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असे विधान इंदुरीकरांनी केले होते.