मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी म्हंटले की, ११ मेला निकाल देण्यात आला आहे. तरी, केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदर केला पाहिजे. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करत आहेत, असे खडे बोल न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावलं.
आमदार अपात्रतेसंबंधी निर्देश देताना पुढील सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचं टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावं, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्रतेप्रकरणी 14 सप्टेंबर रोजी राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी पार पडली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आठवडभराचा वेळ दिला आहे.