Mumbai Local Train: मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या धरपकडीचे सत्र सुरू असून तिकीट तपासनीसाला चुकविण्यासाठी विनातिकीट प्रवाशांची धडपड सुरू आहे. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर आणि पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रेल्वे स्थानकांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अनुक्रमे 1841 आणि 1152 विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार, फलाट येथे तिकीट तपासणीस, आरपीएफ जवान तैनात करून तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम हाती घेतली आहे.
वातानुकूलित लोकलच्या तिकिटाचे दर कमी केल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत विनातिकीट किंवा सामान्य लोकलचे तिकीटधारक वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत आहेत. परिणामी, तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वेकडून ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात सोमवारी 79 तिकीट तपासनीस आणि 19 आरपीएफ जवान तैनात होते.