कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. यातच आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
विवाह सोहळा व समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. तसेच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाटय़ा किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद केल्या आहेत
कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढत चाललेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाटय़ा, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.