पुणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोनासंदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार शनिवार-रविवार कडक लॉकडाउन असणार आहे. तर अत्यावश्यक सेवांनाच शनिवार-रविवार मुभा असेल.
पुणे महानगर पालिकेकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलं आहे. तसेच, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. हे आदेश १८ जून म्हणजेच आजपासूनच लागू असणार आहेत.
- अत्यावश्यक सेवा श्रेणीतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी. इतर दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे शनिवार-रविवार बंद राहतील.
- रेस्टॉरंट, बर, फूड कोर्ट शनिवार-रविवार रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल किंवा घरपोच सेवा देतील.
- कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना – बी-बियाणे, खते, उपकरणे, देखभाल-दुरुस्ती याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची विक्री करणारी दुकाने किंवा गाळे आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहतील.
- पुणे कँटोन्मेंट बोर्ड आणि खडकी कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात देखील हे आदेश लागू असतील.