दोन दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर काल राज्य सरकारकडूनदेखील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी करण्याची घोषणा केली. परंतु, इंधन दरकपातीसंदर्भातील राज्य सरकारची घोषणा अद्याप कागदावरच असून, कर कपातीचा अध्यादेश (GR) जारी करण्यात आलेला नाही.
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol and diesel) उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली. तेव्हा राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लीटर कपात केल्याचे सांगितले. यानुसार व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत (mumbai) पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पेट्रोल प्रतिलिटर 2 रुपये 8 पैसे कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बातमी मिळाली. मात्र आज सकाळी मुंबईत वेगळंच चित्र दिसून आले.
मविआनं दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही; फडणवीसांचीही टीका
राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती प्रसारित केली. मात्र, प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. मविआनं दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम असल्याचे ते म्हणाले. काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे गंभीर असल्याचे मत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
VAT कमी केल्याने 2500 कोटीचे नुकसान
केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पंन कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.