महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चीट दिल्याची सूत्राकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी सहकार विभागाने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार यांच्यासह तत्कालीन ६५ संचालकांना क्लीनचीट देण्यात आली आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदींचा समावेश आहे.
दरम्यान यापूर्वी SIT नेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील ७५ जणांना क्लीन चीट दिली होती. आता सहकार विभागाच्या अहवालातही अजित पवारांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.
हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
या प्रकरणात विनाकारण राजकीय द्वेषभावनेतून मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज 'दूध का दूध पानी का पानी' झालं. विजय सच्चाईचा असतो. मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या एकही मिटींगला हजर नाही, तरीसुद्धा यामध्ये राजकीय द्वेषातून मला जाणीवपूर्वक गुंतवले. ज्यावेळी या कारवाई संदर्भात अजित पवार, पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील इत्यादी मंडळी चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेली होती. त्यावेळी पाटील यांनी त्या मंडळींना धडधडीत सांगून टाकले की, ही कारवाई फक्त हसन मुश्रीफ यांना अडकविण्यासाठी केली आहे, असा गौप्यस्फोटही मुश्रीफ यांनी केला.