मागील 2 आठवड्यांपासून एसटीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळानं हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यानं आता एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटी महामंडळानं 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे.
एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाहीत. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडलं आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचं काम सुरु असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (शुक्रवारी) सांगितलं. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्यानं संपाचा तिढा कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. . संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अनिल परब म्हणाले.
अनिल परब म्हणाले, सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही. इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे.
एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन कराराप्रमाणे वेतन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता उत्तर प्रदेश पॅटर्न राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. . संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.