सोलापूर : इंदौरमधील एसटी बस अपघाताची (Indore Bus Accident) घटना ताजी असतानाच आज आणखी एका एसटी बसचा (ST Bus) अपघात झाला आहे. सोलापूरमध्ये प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी झाली आहे. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे.
सोलापूरहुन गाणगापूरला निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर एसटी बस चालकाचे अचानक नियंत्रण सुटले व बस शेतालगत उलटली. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उचाराकरीता भरती करण्यात आले आहे.
या अपघाताची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, इंदूरहून जळगावच्या दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यप्रदेश राज्यातील धार येथे घडली. ही बस इंदूरहून जळगावातील अमळनेर येथे येणार होती. दरम्यान तिचा अपघात घडला. अपघाताचे नेमेके कारण अद्यापही पुढे आले नाही.