मयुरेश जाधव | अंबरनाथ पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने कुणालाही इजा झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
अंबरनाथ पालिकेची इमारत ही तब्बल ४५ वर्ष जुनी आहे. ही इमारत आता धोकादायक बनली असून पालिकेच्या आत अनेक ठिकाणी प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आता पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचा स्लॅबच कोसळला आहे. बुधवारी मध्यरात्री हा स्लॅब कोसळल्यानंतर गुरुवारी दुपारपासून या स्लॅबचं काम सुरू करण्यात आलं तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वार बंद करून पालिकेत येणारे कर्मचारी आणि नागरिकांना मागच्या दरवाजाने म्हणजे फायर ब्रिगेडच्या पाडलेल्या कार्यालयाकडून प्रवेश दिला जातोय.
अंबरनाथ पालिकेची इमारत जीर्ण झाली असल्यानं नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. मात्र या नवीन इमारतीत पालिकेचं कार्यालय कधी स्थलांतरित होईल? हे अजूनही ठरलेलं नाही. मात्र तोवर अशा घटनांमुळे पालिकेचे कर्मचारी आणि नागरिक जीव मुठीत घेऊन या इमारतीत येतायत.