सूरज दहाट | अमरावती : ईद सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये पोलिसांसमोर "सजा सर तनसे जुदा" हे नारे लागवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ग्रामीण भागात ही मिरवणूक काढण्यात आली होती. याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेते आता आक्रमक झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून अचलपूर व परतवाडा दोन्ही शहर सर्वत्र परिचित आहे. या परतवाडा येथे परवा ईद सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये पोलिसांसमोर "गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा" हे नारे लागण्यात आले. त्यातच डीजेवरही सर तन से जुदा गाणी वाजवली गेली. या वादग्रस्त नारेबाजीमुळं परतवाडामध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आक्षेपार्ह गाणे वाजवल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी सुमोटो कारवाई करत या प्रकरणी आठ ते दहा आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. सध्या या ठिकाणी सर्व परिस्थितीवर पोलीस नियंत्रण ठेवून असून अचलपुरातील दोन्ही समुदाचे झेंडे हे झेंडा चौकातून काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.
दरम्यान, आक्षेपार्ह नारेबाजी प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून ही मानसिकता योग्य नाही. हे नारे लावणारे कार्यकर्ते "पीएफआय"चे असावेत. त्यांच्या घराची तपासणी करावी व त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.