समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या आरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे.या निवडणूकीला भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिस नितेश राणे यांच्या मागावर आहेत. मात्र या निवडणूकीत पोलिसांकडून अटक होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या आरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी सतीश सावत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवल्यानंतर आता अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 13 जानेवारला दुपारी अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रखरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. या निवडणूकीला भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. मात्र या निवडणूकीत नितेश राणे यांना पोलिसांकडून अटक होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.