निसार शेख
Chiplun Latest News : चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात बांधलेल्या संरक्षक भिंतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला. सिद्धांत प्रदीप घाणेकर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. दापोली तालुक्यातील वाकवली येथील घोले महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी होता. सिद्धांतचं कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न होतं. परंतु, महाविद्यालयात प्रवेश करत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी घडली. सिद्धांत महाविद्यालयात प्रवेश करत असताना भिंत कोसळली आणि या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अकडून त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.
सिद्धांत अभ्यासात हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी होता. तो एक खो-खो क्रीडापटूही होता. परंतु, सिद्धांतच्या मृत्यूची बातमी कळताच शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. घाणेकर कुटुंबीय मूळचे दापोली तालुक्यातील देगाव येथील आहे. सिद्धांतने चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला होता.
चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयात घडलेल्या दुर्दैवी अपघाताला कोण जबाबदार आहे? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या काँक्रीट भिंतीवर डीबीजे महाविद्यालय प्रशासनाकडून दडगाडी भिंत बांधण्यात आल्याची माहिती समोर आलीय. परंतु, या बांधकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दगडाची भिंत बांधण्यासाठी परवानगी कोणी दिली? एका वर्षात ती भिंत कशी कोसळली ? तो ठेकेदार कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात असून या घटनेच्या चौकशीची मागणी केली जात आहे.