नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामध्ये भाजपाची (BJP) भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याची टीका शिवसेनेनं (Shivsena) केली आहे. याचपार्श्वभूमीवर सामनातून बंडखोरांवर टीका करण्यात आहे.सरकारच्या आणि शिवसेनेच्या बाजूने उभे राहणाऱ्याविरोधात ‘ईडी’चे (ED) फास आवळले जातात असंही शिवसेनेनं म्हटलंय. तसेच ‘भाजपाचे सरकार आले तरी महाराष्ट्र (Maharashtra) हे पाप स्वीकारील काय?,’ असा प्रश्नही शिवसेनेनं विचारलाय.
बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे. 'महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू, " असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर " 'यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होऽऽ," म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोंडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?
तसेच “आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपामुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपामधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपाच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे? जो भाजपा सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करीत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.