शिवसेनेच्या अग्रलेख सामनातून सतत रोखठोक भाष्य केलं जातं. आतासुद्धा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर या अधिवेशनातून काय मिळालं, जया बच्चन यांनी सरकारला राज्यसभेतच शाप दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासर्व मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामनामधील अग्रलेखातून त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
जया बच्चन म्हणाल्या 'मी तुम्हाला शाप देते, तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका, लोकशाही खतम करा',जया बच्चन यांनी केलेल्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले की, तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल. विरोधी पक्षाचा एवढा अपमान यापूर्वी कधी धाला नसेल"
यासोबतच राऊतांनी लिहीले की, "जुन्या मातोश्री निवासस्थानी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत एक पाटी होती. त्यावर लिहिलेलं 'जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो, तो तो मला माझ्या कुत्र्याची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते-लामरटीन'. यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करत आहात. माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात. आज दिल्लीच्या राजकारणात स्वत:ला देव म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत".