मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा प्रवास कमी वेळात व्हावा याकरिता अटल सेतू महत्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई-पुणे दरम्यानचा एसटी प्रवासाचा वेळ आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू येथून मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बसेस चालवण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या विचाराधीन आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरून घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने या मार्गावरील शिवनेरीचे नवे थांबे, टोलचा खर्च आणि या मार्गावर शिवनेरी चालवणे कितपत व्यवहार्य ठरेल, याचा विचार केला जात आहे.या सर्व चर्चेनंतर आता एसटी महामंडळाला अटल सेतू वरून मुंबई-पुणे शिवनेरी बस प्रायोगिक तत्त्वावर चालवता येणार आहे.
दरम्यान, उद्या दिनांक 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन ते मंत्रालय या मार्गावरुन सकाळी 6.30 वाजता एक फेरी असेल, तर स्वारगेट ते दादर सकाळी 7 वाजता या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. त्यानंतर परतीचा प्रवास सकाळी 11 व दुपारी 1 वाजता याचमार्गे मंत्रालय व दादर येथून निघतील.