प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमश्या पाडवी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. अखेर नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदाराचे खाते उघडणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. आमश्या पाडवी हे मुंबईत असून जिल्ह्यातील काही शिवसेना नेतेही मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याचे रहिवासी असून नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अक्राणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर मंत्री के. सी. पाडवी जवळपास दोन हजार मतांनी जिंकले होते.
निवडणुकीतील यश निसटले असले तरी विधान परिषदेच्या माध्यमातून शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी आमश्या पाडवी यांच्या कार्याची दखल घेऊन विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी नाव घेतल्याचे खात्रीलायक माहिती मिळत असून आमश्या पाडवी यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.