चंद्रशेखर भांगे | पुणे : बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पुण्यातील शिवसैनिकांना (Shivsainik) अटक केल्यानंतर आता पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात (Baban Thorat) यांना देखील मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. अशात जो कोणी गद्दार आमदारांच्या गाड्या फोडेल त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा बबन थोरात यांनी केली होती. यावरुन चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बबन थोरात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बबन थोरात यांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यातील भारती विद्यापीठ येथे आणले आहे.
दरम्यान, उदय सामंत यांच्या गाडी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच शिवसैनिकांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत कात्रज चौकात आले असता आदित्य ठाकरेंचा ताफाही त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांनी प्रचंड मोठी गर्दी चौकात केली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गद्दार गद्दार अशा घोषणा देत गाडीला घेराव घातला. पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला. यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे.