शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अतुल भातखळकर, नितेश राणे आदी नेतेमंडळी उपस्थिती होती.
2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापत शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.