मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ६१ किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा मोदक अर्पण करण्यात आली असून महाआरती देखील करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार रवींद्र मिर्लेकर,पुणे शहर संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, आणि देवाचे आभार मानतो. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. भयंकर अशा को रोना रोगापासून संपूर्ण जगाला, महाराष्ट्राला सर्वांना मुक्ती मिळावी. तसेच अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीतजास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी.त्याचबरोबर श्री गणेश देवा सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडी होण्याच्या दृष्टीने कोरोनाच्या परिस्थितीमधून आम्हाला मार्ग मिळावा. यासाठी आम्ही हा संकल्प करीत आहोत.", अशी प्रार्थना नीलम गोऱ्हे यांनी गणरायाच्या चरणी केली.