मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Workers Strike) काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर आक्रमक पद्धतीने हल्ला केला. सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत चप्पल आणि दगडफेक केली. यावेळी कर्मचारी पोलिसांना न जुमानता गेट तोडून आत गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी नंतर 100 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं असून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सदावर्ते यांना आज मुंबईच्या किला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. या सर्व घडामोडी सुरु असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला एक आव्हान केलं आहे. "सिल्व्हर ओकवर काल झालेली घटना ही त्यांनीच रचलेली नाही हे सिद्ध करायचं असेल तर त्यांनी गुप्तचर यंत्रणांचं अपयश म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांचा लवकरात लवकर राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मग ही त्यांनीच रचलेली कथा असल्याचं स्पष्ट होईल." असं नितेश राणे म्हणाले आहेत.