राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. 30 जुलै रोजी भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाले होते. गणपतराव आणि पवारांचे राजकारणापालिकडे संबंध होते. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण आणि सहकार चळवळ पवार आणि देशमुखांनी एकत्र चालवली.
आज पवारांनी कुटुंबाचे सांत्वन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझे पवार कुटुंब शेकापचे समर्थक होते त्यावेळेस पासून गणपतराव देशमुख आणि पवार कुटुंबाचे संबंध होते. ते आजही आहेत.
गरीब , कष्टकरी जनतेला हक्कचा रोजगार मिळावा यासाठी ते आग्रही होते. आज देशाने स्वीकारलेली रोजगार हमी योजनेचे जनक गणपतराव देशमुख आहेत. एक पक्ष , एक निष्ठा काय असते हे देशमुखांनी दाखवून दिले. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा असा नेता होणे नाही, अशा शब्दात पवारांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई , मुलगा पोपटराव, चंद्रकांत, नातू डॉ अनिकेत आणि डॉ बाबासाहेब आदी उपस्थित होते.