चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सिल्लोड मतदार संघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याला सत्तारांनी कोट्यावधी रुपयांची वर्गणी गोळा करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात १ ते १० जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना पाच कोटी रुपयांची वर्गणी जमा करण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. या वर्गणीसाठी चार प्रकारच्या हजारोंच्या प्रवेशिका तयार करण्यात आल्या असून कृषी खात्यामार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. कृषी महोत्सवात प्रवेशासाठी चार प्रकारचे व्हीआयपी पासेस तयार करण्यात आले आहेत.
प्लॅटिनमसाठी पंचवीस हजार, गोल्डनसाठी दहा हजार, सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये असे चार प्रकारच्या प्रवेशिका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते आणि किटकनाशी बियाणे विक्रेत्यांना द्यायचे आहे व त्या बदल्यात पैसे गोळा करून ते कार्यालयाकडे जमा करायचे आहेतय याबाबतची तोंडी सूचना अब्दुल सत्तार यांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तारांनी मागील सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार आता जनहित याचिकेत उघड झाला आहे. या आदेशाला आता न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.