भारत गोरेगावकर, रायगड | माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रायगड जिल्हयातील आघाडीत बिघाडी झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक पार पडली. या दोन तास रंगलेल्या बैठकीतनंतर सर्व सर्व काही आलबेल असल्याचा दावा करण्यात येत आहे.
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. "राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच," असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर रायगड जिल्हयातील महाआघाडीत बिघाडी झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने रायगडमध्ये येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. ज्यामध्ये सेना पदाधिकाऱ्यांकडून तटकरेंच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. तर दुसरीकडे खासदार तटकरे यांनी देखील राजकीय उत्तर द्यायला राष्ट्रवादी समर्थ असल्याचे विधान केल्याने आघाडीत फूट पडते की काय अशीच राजकीय चर्चा होती.
आज अलिबाग मध्ये होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी जाहीरपणे पालकमंत्री निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र शिवसेनेच्याच आजी माजी आमदारांनी नवगणे यांना गप्प केले. यानंतर खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदरांची एक गुप्त बैठक घेतली.ही बैठक तब्बल दोन तास रंगली होती. या बैठकीत शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भुमिकेत होते त्यांना समजावण्यात दोन तास निघून गेले. या बैठकीनंतर मात्र सर्व जण आघाडीचा धर्म पाळणार असल्याची सारवा सारव करण्यात आली.