निस्सार शेख | रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर स्कुलबसचा भीषण अपघात झाला आहे. बोलेरो कार व स्कुलबसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात स्कुल बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले. कापसाळ डिगेवाडी बस स्थानका समोर सोमवारी सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता काम केली जात आहेत. मात्र, यावर दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात अशाच पद्धतीने झाला आहे. विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेची बोलेरो गाडी चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडकडे घेऊन चालला होता. संदीप सावंत कामथे डिगेवाडी बस स्थानकासमोर आला असता परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कुलची बस अचानक विरुद्ध दिशेने आली. यामुळे दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक बसली. यामध्ये बस जागीच पलटी झाली.
या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व तातडीने स्कुल बसमधील १४ विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, संदीप सावंत यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. मात्र, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा पोलिसांमार्फत सुरु आहे.