आदेश वाकळे | अहमदनगर : अकोले तालुक्यातील जाचकवाडी गावातील शिवारात दोघा तरुणांनी मिळून हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी टोमॅटो शेतात मृतदेह गाडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाचकवाडी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथे सावकाराने दिलेल्या पैशांची वारंवर मागणी सुरू केल्याने सावकाराचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशोक फापाळे व भाऊसाहेब महाले या दोघांनी लामखडे यांची निर्घृणपणे हत्या केली व मृतदेह टोमॅटो पिकाच्या फडात गाडून टाकला. तर मोटर सायकल उसाच्या फडात लपवून ठेवली होती. सरपंच लामखडे घरीच आले नाही म्हणून कुटुंबुयांनी शोधाशोध केली. परंतु, रात्री ते घरी न आल्याने त्यांनी अखेर घारगाव पोलिस स्टेशन गाठत लामखडे हरवल्याची तक्रार दिली. घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस कैलास देशमुख यांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर आरोपीपर्यंत पोहचले. मात्र, आरोपी देखील पोलीस तसेच लामखडे कुटुंबासोबत त्यांचा अंकुश लामखडे यांचा शोध घेण्याचा बनाव करत होते.
दोन दिवस घारगाव पोलिसांना गुंगारा देत तसेच शोधाशोधीचा बनाव करतं पोलिसांची दिशाभूल करत होते. परंतु, लामखडे यांच्या कुटुंबाने तेथील सर्व परिसर पिंजून काढला. अखेर कुटुंबियांना सरपंचाची मोटर सायकल ऊसाच्या शेतात मिळून आल्याने संशय बळावला. पोलीस कैलास देशमुख यांनी भाऊसाहेब महाले याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच अखेर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव देखील सांगितले. अधिक तपास करत अकोले पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे तसेच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शनानुसार अकोले पोलीस व घारगाव पोलिसांनी सापळा रचून अशोक फापाळे यास बेड्या ठोकल्या आहे.