प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्याची ऐव्हरेस्ट कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका मोहितेला दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रियांकाला गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडाप्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळय़ाला त्यांच्या मातोश्री शोभा मंगेश मोहिते या उपस्थित होत्या. प्रियांकाच्या पर्वतीय साहसाला कारणीभूत ठरलेला गिरीदुर्गराज सह्याद्री, मराठी माणसातील प्रखर जिद्द आणि साहसाचा महाराष्ट्राचाही अभिमान आहे. गिर्यारोहणातील विशेष उल्लेखनिय कामगिरीकरीता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडापुरस्कार 2019 साली मिळाला आहे. जगातील 14 अष्टहजारी हिमशिखरांपैकी 4 हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका या पहिल्या महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून जगभरात सुविख्यात आहे. इतकेच नाही तर जगातील सर्वोच्च अशा माऊंटएव्हरेस्ट वर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी मिळवलेल्या तगडय़ा यशानंतर, जगातील 4 थे ल्होत्से (8,516 मीटर), 5वे मकालू (8,463 मीटर) आणि 2021 मध्ये तर अत्यंत भयावह असे 10वे अन्नपुर्णा (8,091 मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरीत्या चढाई केलेली देखील त्या पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरल्या. त्यामुळेच तीच्या उदंड साहसाचा सन्मानपूर्ण गुणगौरव या पुरस्कारामुळे झाला आहे.