एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारुन त्याच मातीमध्ये गाडू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हे रितीरिवाज नाही आहेत. वारंवार यायचं संभाजीनगरला आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असा या ओवैसी बंधूचे राजकारण दिसत आहे. परंतु इतकेच सांगेल त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पढताय कधीतरी त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
औरंगजेब संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि महाराष्ट्रातील मंदिर प्रार्थना स्थळे उद्धवस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर २५ वर्ष मराठा योद्ध्यांनी लढाई लढली आहे. त्याच महाराष्ट्रात तुम्ही येऊन कबरीचे दर्शन घेऊन प्रार्थना कराल तर हे महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे झाले आहे. आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे समजा, औरंगजेबला याच मातीत जावे लागले होते. त्यांच्या भक्तांनासुद्धा याच मातीत जावे लागेल. महाराष्ट्राची माती मर्दांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“काश्मिरी पंडितांची घऱवापसी हा भाजपाचा आणि मोदी सरकारचा मुख्य अजेंडा होता. त्यासाठी कलम ३७० हटवण्यात आलं. आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तरीही काश्मिरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. आजही काश्मीर शांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. फक्त काश्मिरी पंडित नाही तर तेथील सामान्य जनतेचं जीवनही असुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही तुम्ही काय कठोर पावलं उचलता हे पहावं लागेल,” असं राऊत म्हणाले.
अकबरूद्दीन औवेसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचे दर्शन
एमआयएमचे खासदार अकबरूद्दीन औवेसी औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते. एका कबरीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचे दर्शन घेतले, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी दिली आहे.