शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. तर या गटाकडे आमदारांचा ओढा कायम आहे. अनेक अपक्षांचाही शिंदेंना पाठिंबा आहे. या सगळ्यांसह आता शिंदे राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. याचदरम्यान शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालते. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी ते आमदार मुंबईत येतील, त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. राऊतांनी (sanjay raut) आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
"ही आता कायदेशीर लढाई आहे. काही नियम आहेत. काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे. काय होतंय ते पाहू ना, शेवटी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत. कोण म्हणतात 40 आहेत, कोण म्हणतात 140 आहेत. जे असतील ते असतील, पण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकसंध आहेत, असंही ते म्हणालेत.
एकनाथ शिंदेंनी पाठीमागे महाशक्ती असलेल्या विधानावर संजय राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे, कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना हा महासागर आहे, हा कायम उसळलेला असतो. महासागर कधी आटत नाही. लाटा येतात आणि लाटा जातात ही सुद्धा लाट निघून जाईल, जे गेलेत त्यांना पश्चात्ताप होईल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.