संभाजीराजे छत्रपती (chhatrapati sambhajiraje) यांच्या राज्यसभेवरच्या जागेविषयीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेने संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेना (shivsena) कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणी असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार उभे राहतील आणि निवडून जातील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा
संजय राऊत हे सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी म्हटले की, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याच जाहीर केले आहे. त्यांनी ही घोषणा केली होती, त्याअर्थी त्यांनी जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या ४२ मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. पण संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. पण आम्हाला आमचे २ उमेदवार निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही.
दोन जागा शिवसेना लढतेय
तसेच दोन उमेदवार देऊ आणि ते दोन्हीही निवडून आणू अशी भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले, "दोन जागा शिवसेना लढतेय. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि निवडून आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केलीये. जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देतंय. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही.
आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास सांगितले. आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. संभाजीराजे छत्रपती यांनीही एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे होते.आमचा कोणालाही विरोध नाही. पण राज्यसभेच्या दोन जागांवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून जातील. ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांच्यावतीने सांगत आहे, माझ्या मनातलं काहीतरी सांगत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.