उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना एका वृत्तमाध्यमाने प्रश्न विचारला असता त्यांनी "मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी.
विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
"महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा हे एकमेव हत्यार आहे. आरोप खोटे, बनावट असतील तर त्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा मजबूत आणि निष्पक्ष आहे. केंद्रात भाजपाचं सरकार असल्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांना त्रास देणं हीच एक ताकद त्यांच्या हातात आहे".
राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. सरकारने यासाठी आता रणनीती आखण्याची गरज आहे असे सांगितले.त्यासोबत गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.तसंच विधानसभा अध्यक्ष निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचे संकेत दिले आहेत
"शिवसेनेला दिलेला शब्द जर त्यावेळी भाजपाने पाळला असता तर कदाचित उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती हे आम्ही वारंवार सांगत आहोत. त्याबद्दल खंत किंवा खेद वाटण्याचं कारण नाही. आम्ही तिघांनी मिळून आता मार्ग स्वीकारला असून व्यवस्था तयार केली आहे आणि ती पुढे नेणं कटिबद्धता आहे," असं यावेळी ते म्हणाले.
कोण होता डॉ. पाउल योजेफ गोबेल्स?
एक जर्मन राजकारणी होता. इ.स. १९३३ ते १९४५ दरम्यान तो नाझी जर्मनीमधील एक महत्त्वाचा मंत्री होता. ॲडॉल्फ हिटलरच्या सर्वात विश्वासू व आंतरिक गोटामधील एक असलेल्या ग्योबेल्सने नाझी पक्षाची धोरणे व विचार सामान्य जर्मन नागरिकांपर्यंत पोचवण्याची भूमिका पार पाडली. त्याच्या कट्टर ज्यूविरोध व प्रभावी भाषणशैलीसाठी तो ओळखला जात असे. १९३५ साली न्युर्नबर्ग कायदे मंजूर झाल्यानंतर ज्यू लोक चालवत असलेले व्यवसाय व उद्योग बंद पाडण्याची व ज्यूंचे पूर्ण खच्चीकरण करण्याची योजना त्याने आखली. ग्योबेल्सने अनेक ज्यूविरोधी चित्रपट बनवले. त्याच्या योजनेनुसार इ.स. १९३८ साली जर्मनीमध्ये अनेक सिनेगॉग जाळण्यात आले व शेकडो ज्यूंची कत्तल करण्यात आली.