एकनाथ शिंदेसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना आसामचं वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत त्यांना आसाममध्ये आराम करायचा आहे. महाराष्ट्रात या बंडखोरांचं काही काम नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला दिला आहे. या बेडक्यांच्या डबक्यात पडू नका, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. लवकरच ठाण्यामध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसेल असंही सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
आज मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या पद्धतीने करुन महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये. काही लोकांनी आता एक डबक तयार केलं आहे. त्यामुळे त्यांनी या डबक्यात उतरू नये अन्यथा पंतप्रधान मोदी, ते स्वत: आणि पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यपाल यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, १२ आमदार राजभवनाच्या टेबलावर पडून आहेत, त्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असा टोला राऊतांनी राज्यपाल कोश्यारींना लगावला आहे. राऊत म्हणाले, बंडखोरांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर चलबिचल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना काय करायचं हा त्यांचा निर्णय असून तो घेण्यासाठी ते सक्षम आणि समर्थ आहेत. गुवाहाटीमध्ये बसुन सल्ले देण्याची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना लगावला आहे.