संजय देसाई, सांगली
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी निर्माण झाली आहे. 24 तासांत 172 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.
वारणा नदीला सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी असणारे 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन शहरातल्या पूरपट्ट्यातल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले.
मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली असून चार दरवाज्यातून 8 हजार 886 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.