मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन सूरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून संभाजीराजे छत्रपतींच्या आरोग्य तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय टीम आली नसल्याचा आरोप मराठा समन्वयक करत आहेत. या आरोपावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा आंदोलकांनी आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान आझाद मैदानावर उद्रेक केला. यावेळी मराठा समन्वयकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. राज्य शासनाने डॉक्टर पाठविणे गरजेचे असताना २४ तासांनंतरही युवराज संभाजीराजेंची शासकीय वैद्यकीय तपासणी करीता एकही डॉक्टर सरकारने पाठवला नसल्याचा आरोप केला. त्यामुळे सरकारच्या या असंवेदनशीलतेचा सर्वजण निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोपांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, युवराज संभाजीराजे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणास बसले आहेत. त्याठिकाणी तातडीने त्यांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टरांची टीम पाठविण्यात आली आहे. सकाळी १० वाजता फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ.चिखलीकर यांनी व टीमने यांचा रक्तदाब, शुगर, पल्स याची तपासणी केली आहे. थोडासा अशक्तपणा असून बाकी तब्येत व्यवस्थित आहे, अशी माहिती देत आरोप फेटाळले आहेत.
तसेच दर सहा तासांनी त्यांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्फत करावी अशा सूचना दिल्या आहेत. युवराज संभाजीराजे यांच्या तब्येतीच्या अनुषंगाने योग्य ती काळजी आपण घेत आहोत असेही टोपे पुढे म्हणाले आहेत.