सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे तसेच अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली असल्याचे वाझे यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सांगितले की, मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचेही नाव दिले आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. असे देखिल वाझे यांनी म्हटले आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भितीने विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत, महात्मांच्या वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी पराभव मान्य केलेला आहे. ज्या अॅन्टिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे त्यानंतर एका व्यक्तीचा खून केला गेला महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या प्रकरणातले दोन मुख्य आरोपी, पोलीस खात्यातले. त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांना क्लिनचीट दिली आणि उरलेलं दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सुटले. आणि दुसरे जे महात्मा आहेत ते अशा प्रकारचे पत्रव्यवहार करुन. म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली त्यांनी काही फडणवीसांवर आरोप केलेत. फडणवीसांना उत्तर देण्यासाठी तुरुंगातला प्रवक्ता लागतो. राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करत आहेत. हे मी वारंवार सांगतो आहे. ते तुम्हाला आता सिद्ध झालं असेल. तुरुंगात यांचे फोन जात आहेत. सरकारचे प्रतिनिधी तुरुंगात जात आहेत. खुनातल्या, दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देत आहात.
या महाराष्ट्राचा राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षाने खासकरुन फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका टोळीने किती खाली आणलेला आहे. हे जे मी वारंवार बोलतो आहे त्याला स्वत: फडणवीसच पाठबळ देता आहेत. तुमच्याकडे प्रवक्ते नाहीत मला माहित आहे. तुरुंगातील लोकांना तुम्ही भाजपाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं आज खाली गेली आहे. एक गुंडाला आणलं जाते बाहेर त्याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत आणि तो सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. या सगळ्या भाजपाच्या लोकांची नार्को करा म्हणजे कळेल गेल्या दहा वर्षात त्यांनी काय केलं आहे. ईडीचा गैरवापर करुन आम्हाला अडकवण्यात आलं.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता जयंत पाटील यांचे नाव त्यांनी घेतलं आहे. म्हणजे काय असे तुरुंगातील दहा लोक उभे करुन शकतो जे फडणवीसांचे नाव घेऊ शकतील. ते बावनकुळेंचं नाव घेतली, अमित शाहांचे नाव घेतील. अमित शाह पण तुरुंगात जाऊन आलेत ना. या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची हे राज्याच्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा वारंवार आक्षेप आहे की, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे गटार केलेलं आहे. फडणवीसांनी समोर येऊन सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की, एका गुंडाच्या, दहशतवादाच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेऊ नका. हे गृहमंत्री म्हणून त्यांचे काम आहे. असे संजय राऊत म्हणाले.